५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Friday, 11 November 2022

बालदिन भारताची पहिले पंतप्रधान

 बालदिन, भारताची पहिले पंतप्रधान

पं. जवाहरलाल नेहरू


भारताचे पहिले पंतप्रधान भारतभाग्यविधाते, जागतिक शांततेचे अध्वर्यू, महात्मा गांधीचे कंठमणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मूळ घराणे काश्मीरचे. त्यांचे आडनाव कील. यांचे एक पूर्वज नदीच्या कालव्याच्या काठी राहत होते. हिंदी भाषेत कालव्याला 'नहर' असे म्हणतात. नहरच्या काठी राहणारे ते नेहरू असे त्यांचे आडनाव झाले असे म्हणतात. मोतीलाल नेहरू व त्यांची पत्नी स्वरूपराणी यांना एका साधुपुरुषाच्या आशीर्वादाने एक मुलगा झाला. तोच पुढे जवाहरलाल म्हणून प्रसिद्ध झाला. जवाहरलाल यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. जवाहरलाल लहानपणापासूनच अत्यंत श्रीमंतीत व पाश्चात्य जीवनपद्धतीत वाढले. त्यांच्या आईने मात्र त्यांच्यावर भारतीय विचारांचे संस्कार केले होते.

भारतातच काही शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल १९०५ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हॅरो, केम्ब्रिज, ट्रिनिटी या शिक्षणसंस्थांत शिक्षण घेतले. या काळात त्यांनी भरपूर वाचन केले; देशोदेशीच्या देशभक्तांची चरित्रे वाचली. आपल्या देशासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. यादरम्यान ते बॅरिस्टरही झाले. १९९२ साली ते भारतात परत आले. अलाहाबादच्या उच्च न्यायालयात ते वकिली करू लागले. लौकरच त्यांचा कमलदेवी कील यांच्याशी विवाह झाला. १७ नोव्हेंबर, १९१७ रोजी त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव इंदिरा प्रियदर्शिनी (हीच पुढे भारताची पंतप्रधान झाली). लखनीच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांची म. गांधींशी भेट झाली. गांधीजींच्या विचारांचा जवाहरलाल यांच्यावर मोठा प्रभाव पडला. राजकारणात गांधीजींच्याच मार्गाने जायचे असे त्यांनी ठरविले. सत्याग्रह, अहिंसा, स्वदेशी, असहकार हे मार्ग वापरून इंग्रजी सत्तेविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात जवाहरलाल सहभागी झाले. १९१९ मध्ये रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरविले.

पं. नेहरू त्या सत्याग्रहात सामील झाले. इंग्लंडचा युवराज भारतात आला. त्याच्या स्वागतावर काँग्रेसने बहिष्कार घातला. त्यासाठी झालेल्या निदर्शनात पं. नेहरूंनी भाग घेतला. त्यात त्यांना सहा महिन्यांची कैदेची शिक्षा झाली. १९२७ साली 'सायमन कमिशन' भारतात आले. काँग्रेसने त्याविरुद्ध लखनी येथे निदर्शने केली. त्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पं. नेहरू जखमी झाले. १९२९ साली लाहोरला काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्याच्या अध्यक्षपदी पं. नेहरूंची निवड झाली. त्याच अधिवेशनात त्यांनी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला व तो मंजूर करून घेतला.

१९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात ९ ऑगस्ट, १९४२ ते २८ मार्च, १९४५ पर्यंत पं. नेहरू अहमदनगरच्या तुरुंगात होते. तेथेच त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा भारताच्या इतिहासावरील मोठा ग्रंथ लिहिला.

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताचे दोन तुकडे झाले. भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे जन्मास आली. पं. जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. स्वतंत्र भारतापुढे अज्ञान, बेकारी, दुष्काळ, निर्वासित असे अनेक गंभीर प्रश्न होते; परंतु नेहरूंनी या सर्व संकटातून भारताची नौका पुढे नेली; वैज्ञानिक प्रगती, शेती विकास, इत्यादीसाठी अनेक योजना आखल्या.

पं. नेहरू रसिकराज होते. त्यांनी तुरुंगातून लिहिलेली 'इंदिरेस पत्रे' यांतून त्यांच्या कविमनाचा परिचय होतो. त्यांना गुलाबाची फुले खूप आवडत. त्यांच्या रसिकतेचा गुलाब कधीच सुकला नाही. त्यांना लहान मुलांच्या सहवासाचे मोठे वेड होते. जगभर त्यांना 'फुलामुलांचे नेहरू' म्हणून ओळखले जात असे. लहान मुलांचे ते चाचा नेहरू होते; म्हणून त्यांच्या जन्मदिनी १४ नोव्हेंबरला 'बालदिन' साजरा करण्याची प्रथा पडली. ते सलग १८ वर्षे भारताचे पंतप्रधान होते. १९५२ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केल्याने निराश झालेले पं. नेहरू २७ मे, १९६४ रोजी निधन पावले.


No comments:

Post a Comment

Write a comment.