विकास अंतरंगाचा
व्यक्तीच्या जीवन कार्याचा महत्वाचा भाग
म्हणजे त्याच्या अंतरंगाचा विकास होय.श्रमाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण,
नितीविना व्यापार, सद्सद्विवेक बुद्धीविना विकास, मानवतेविना
विज्ञान यावर १९२४ मध्ये म. गांधींनी विवेचन करून जाणवलेल्या सामाजिक
जाणिवांवर अचूकबोट ठेवले.आज बौध्दिकतेचे विलक्षण प्रेम असले तरी पावलोपावली
माणुसकी हरवलेले वर्तन माणुसकी अनुभवायला मिळते. यातून वैयक्तिक जीवन आणि राष्ट्र
दोन्हींवर दुष्परिणाम झालेले दिसतात. त्यामुळेच बाह्यात्कारी
व्यक्तिमत्त्वापेक्षादेखील आपले अंतरंग अत्यंत शुद्ध, स्वच्छ व पारदर्शी असणे गरजेचे
आहे. यामुळेच मूल्यशिक्षण हा व्यक्तिमत्त्व
विकासातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
मूल्य म्हणजे नैतिक मूल्य. चारित्र्य घडणीसाठी इष्ट वर्तन, तत्त्वे. मूल्ये 'दिसत' नाहीत किंवा 'पाहता' येत नाहीत. व्यक्ती 'काय बोलते', 'कसे बोलते', 'काय करते' यावर त्याचे अनुमान करता येते.
मूल्यांवर
नुसती व्याख्याने देऊन भागत नाही.तर कार्य, कृती व आचरणातून ती मुलांच्या
संवेदनशील मनावर बिंबवता येतात. मूल्यशिक्षणाची सुरवात घरापासून व कुटुंबात होते.
यापुढचे कार्य असते शिक्षणसंस्थेचे. नीतिमूल्ये म्हणजे समाजात, कुटुंबात, परस्परांशी वागण्याचे ठरलेले नियम, असे ढोबळमानाने सांगता येईल.
सर्वसाधारणपणे व्यक्ती म्हणून सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, सहानुभूती, संयम, शांत मनोवृत्ती, श्रमनिष्ठा, चिकाटी, नम्रता, प्रयत्नशीलता, सहकार्य, कृतज्ञता, न्याय, बंधुत्व अशा अनेकानेक मूल्यांचा अंगिकार करायला हवा. राष्ट्रविषयक
मूल्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, सर्वधर्मसमभाव, विज्ञाननिष्ठा आदी मानवहितकारक आचारविचारांची जोपासना
करायला हवी. ही अशी अनेक मूल्ये महत्त्वाची असली तरी आपल्या दैनंदिन जीवनात
सुरवातीला आपण काही मूल्यांचा विशेष विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment
Write a comment.