हिंदी दिन
विविधतेने
नटलेल्या व विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या भारतामध्ये सर्वांना समजणारी व सर्वमान्य
झालेली हिंदी भाषा ही आता व्यवहारासाठी सुसंवादी भाषा म्हणून महत्त्वाची ठरली आहे.
दिनांक १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटनासमिती द्वारा हिंदी ही राष्ट्रभाषा करावी हा
निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा दिवस हिंदी दिन म्हणून पाळण्यात येतो.
हिंदी
भाषा मुळात सरळ, मधुर व सुबोध आहे. त्यामुळे जनसामान्यांना ती
आवडते. सिनेमा जगताने हिंदी भाषा विकासात एक प्रकारे मदतच केली आहे. हिंदी
सिनेमांमुळे लोकांना हिंदी भाषा बोलण्यास व समजण्यासाठी सोपी झाली आहे. आज
प्रत्येक ज्ञानशाखेतील हिंदी शब्दावली निर्माण केली गेली आहे. विविध संस्थांचे
प्रशिक्षण हिंदीमध्ये होऊ लागले आहे. बँका, व्यापार, प्रशासन, सांख्यिकी, आंतरराष्ट्रीय
कारभार आणि संगणक या विषयावरील बरीच पुस्तके आता हिंदी भाषेत उपलब्ध झालेली आहेत.
आजची ७५% कार्यालयातील कामे हिंदीतून होताना दिसतात.
बी.बी.सी. च्या हिंदी कार्यक्रमामध्ये व टी.
व्ही. चॅनेलस्वर हिंदी कार्यक्रमांची ६०% वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे हिंदी
समाचारपत्रके व वृत्तपत्रेही आता खूप निघाली आहेत. ऐतिहासिक, पौराणिक किंवा वैज्ञानिक घटना, प्रसंगांची सिरियल्स
दूरदर्शनवरून जास्त करून हिंदीमध्येच प्रसारित केल्या जातात. म्हणजेच राष्ट्रभाषा
हिंदी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली व सर्वांना रुचली आहे असेच म्हणावे
लागेल.
स्वातंत्र्याच्या
या ५० वर्षांच्या काळात हिंदी भाषा विदेशातही जाऊन पोहोचली आहे. १९७७-७८ साली
त्यावेळेचे विदेशमंत्री श्री. अटलबिहारी वाजपेयींनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये
हिंदीमध्ये भाषण करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. जगामध्ये हिंदी भाषा
बोलणारे लोक तिसऱ्या क्रमांकावर, इंग्रजी बोलणारे दुसऱ्या
क्रमांकावर तर चिनी भाषा बोलणारे प्रथम क्रमांकावर आहेत. सध्या बरेच भारतीय लोक
श्रीलंका, मलेशिया, बर्मा, फिजी, सिंगापूर इ. ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. ते
बहुधा उत्तर भारतीय आहेत व ते जास्त स्वरूपात हिंदी भाषेचा उपयोग करतात. सध्या
जगामध्ये १२५ हून अधिक विश्वविद्यालयातून हिंदी अध्ययन-अध्यापन वा संशोधन चालू
आहे.
राष्ट्रभाषा
हिंदीच्या प्रचारासाठी 'राष्ट्रभाषा प्रचार समिती' भारतात व परदेशातही हिंदीच्या परीक्षा आयोजित करते. १९७१ मध्ये केंद्रीय
समितीने व्यापक कार्यक्रम हाती घेऊन, हिंदी वाचनालयाची
स्थापना, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती शब्दकोशांचे प्रकाशन
हिंदी शिक्षकांची नियुक्ती व प्रदर्शन असा भरीव कार्यक्रम पार पाडला. नेपाळमध्ये
एक विशाल हिंदी पुस्तकालय उभारले जात आहे. अशा प्रकारे हिंदी भाषेचा देशात व
परदेशातही चांगलाच प्रचार झालेला दिसून येतो. प्रांतीय भाषा, राष्ट्रभाषेचा विकास एकमेकास पूरक ठरत आहे. या हिंदी दिनी 'एक हृदय हो भारत जननी' चा संदेश घेऊन राष्ट्रीय
एकात्मता साधली जावी.
No comments:
Post a Comment
Write a comment.