राष्ट्रीय युवक दिन
१२ जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस अधिकृतरित्या 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ! स्वप्ने रंगविण्याचा, उंच भरारी मारण्याचा, ध्येयनिश्चितीचा, वीरता प्रकट करण्याचा सुवर्णकाळ म्हणजे युवावस्था! उपनिषदांच्या काळात सत्यकाम जाबाल, श्वेतकेतु, आरुणि, युवराज सिद्धार्थ यांच्यासारखे तरुण जीवनाचे रहस्य शोधून काढण्यासाठी ऐन तारुण्यात बाहेर पडले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, समाजसेवकांनी आपली उमलती जीवने व प्राण ध्येयपूर्तीसाठी अर्पण केले. आज देशाच्या स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती साजरी झाली तरी देशातील अनेक समस्या सोडविण्याचे आव्हान युवापिढीसमोर उभे आहे. लोकसंख्यावाढ, निरक्षरता, अंधश्रद्धा, गरिबी, भ्रष्टाचार, स्वार्थांधता, जातिभेद, अन्याय, बेरोजगारी, हिंसाचार इत्यादी संकटांवर मात करून देशासाठी व समाजासाठी निरपेक्षतेने झटून कार्य करणाऱ्या युवा नेत्यांची आज देशाला अत्यंत गरज आहे.
"जोपर्यंत लाखो लोक अज्ञानात आणि दारिद्र्यात खितपत पडले आहेत तोपर्यंत त्यांच्या जिवावर शिक्षण घेऊन मग त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करणारा युवक कृतघ्न आणि देशद्रोही होय, गरिबांच्या दुःखाने ज्याला वेदना होतात खरा महात्मा अन्यथा तो दुरात्माच!" असे विवेकानंदांनी म्हटले आहे. आपण सच्चे देशभक्त व्हायचे की देशद्रोही, महात्मा व्हायचे की दुरात्मा याचा निर्णय तरुणांनीच घ्यायचा आहे.
उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघे टाकावे; वन्ही तो चेतवावा । चेतवीताचि चेततो ।। आलस्य अवघाचि दवडावा। प्रयत्न उदंडचि करावा ।।
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे। सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जे करील तयाचे ।।
अशा प्रकारे श्री रामदास स्वामींनीही देव-धर्म-राष्ट्रासाठी देह झिजवून परमार्थ साधावा हा युवकाना कळकळीचा संदेश दिला आहे.
काळ कोणासाठी थांबून राहत नाही. वेळ हीच संपत्ती हे न विसरता आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणे हाच युवकांचा धर्म आहे. केवळ नोकरी हे शिक्षणाचे व जीवनाचे उद्दिष्ट नाही तर सस्कारक्षम 'सु' शिक्षिततेसाठी, जीवनाच्या व राष्ट्राच्या यशस्वितेसाठी वाचन, मनन, उद्योजकता, आरोग्यसंपन्नता, समाजसेवा व स्वावलंबनत्व हे गुण टी. व्ही. - सिनेमे - फॅशनपेक्षा शतपटीने आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे.
हवाईदल, नौदल, लष्कर, क्रीडाक्षेत्र, कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र इत्यादी अनेक क्षेत्रापैकी एखाद्यातरी प्रांतात शक्ती-युक्ती-बुद्धीने ठसा उमटविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा युवक-युवतींनी बाळगावयास हवी. समाजानेही त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून ही प्रचंड युवाशक्ती विधायक कार्याकडे वळविली पाहिजे 'सामर्थ्य हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू! उठा धीट बना!'
babasaheb jantti prshnmanjusha
स्वामी विवेकानंदांनाच्या या आवाहनाला साथ देऊन युवकांनी देशाचे आधारस्तंभ बनावे हाच राष्ट्रीय युवकदिनाचा उद्देश आहे.
No comments:
Post a Comment
Write a comment.