भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
भारतीय घटनेचे शिल्पकार, हिंदू समाजातील दलित वर्गाचे कैवारी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील 'मह' या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईच नाव भीमाबाई. बाबासाहेब लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते; परंतु ते अस्पृश्य जातीत जन्मास आले होते. त्या काळी अस्पृश्य समाजाला अत्यंत हीन वागणूक मिळत असे. सवर्ण लोक अस्पृश्यांचे तोंड पाहणे, त्यांना स्पर्श करणेही टाळीत असत. या अस्पृश्यतेची झळ डॉ. आंबेडकरांना विद्यार्थिदशेत फार बसली. ते केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना संस्कृत शिकता आले नाही. शाळेत त्यांना पर्शियन भाषा घ्यावी लागली. संस्कृतचा अभ्यास त्यांनी स्वकष्टाने केला. १९०७ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये ते बी.ए. झाले. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली व त्यानंतर पीएच्.डी. पदवीही मिळविली. अमेरिकेतून परत आल्यावर त्यांना बडोदे संस्थानमध्ये नोकरी मिळाली; पण तेथेही त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. ते केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना गावात राहावयास जागा मिळेना. कार्यालयातील हाताखालचे लोकसुद्धा बाबासाहेबांशी अत्यंत तुच्छतेने वागत.
आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषिताला सुद्धा जर अशी अमानुष, हीन वागणूक मिळते तर खेड्यापाड्यात, अज्ञानात, दुःखदारिद्र्यात पिढ्यान्पिढ्या खिचपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य समाजाला कोणत्या प्रकारची वागणूक मिळत असेल; त्यांना किती अनन्वित छळ सोसावा लागत असेल या विचाराने बाबासाहेब अतिशय दुःखी झाले. त्यांनी 'मूकनायक' नावाचे पाक्षिक काढून त्यातून दलितांवरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन आपल्या दलित बांधवांना, न्याय्य हक्कांसाठी संघर्षास सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दलि बांधवांना संदेश दिला. 'उठा, जागे व्हा, शिक्षण घ्या, आपण आपल्या बांधवांचा करा, कुणाच्या दयेवर जगू नका.'
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी केल्या. नाशिक काळाराम मंदिर, महाडचे चवदार तळे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आंदोलने केली. १९२७ साली महाडला अस्पृश्यताविरोधी परिषद भरली होती. बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांसह चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श केला; मनुस्मृतीची होळी केली; लंडनमधील गोलमेज परिषदेत म. गांधींना विरोध करून दलितांची बाजू प्रभावीपणे मांडली. भारताची घटना तयार करण्याचे काम करणाऱ्या समितीचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्याव बाबासाहेब केंद्रीय मंत्रिमंडळात गेले व कायदामंत्री झाले; पण मतभेदामुळे त्यांनी नंतर राजीनामा दिला. ते काही काळ राज्यसभेचे सभासद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांनी विचारपरिप्लुत अनेक ग्रंथ लिहिले. अस्पृश्यांवर होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी अनेक वेळा धर्मातराची घोषणा केली. शेवटी १९५६ साली दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूर येथे आपल्या हजारो अस्पृश्य बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ६ डिसेंबर १९५६ रोजी ते बुद्धवासी झाले. बाबासाहेबांना 'भारतरत्न' हा बहुमान १९९० साली मरणोत्तर प्रदान करण्यात आला.